कोण मारणार बाजी; चर्चेला उधाण !

Foto

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या गुरुवार रोजी होणार आहे. मतमोजणीला काही तास उरले असल्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. मतदार राजाचा कौल कुणाला हे उद्या होणार्‍या मतमोजणीतून समोर येणार आहे. प्रशासनाच्या वतीने मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. आज दुपारी मतमोजणीचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. शांतता व सुव्यवस्था आबादित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला असून गस्त वाढविण्यात आली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून कोण बाजी मारणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 

या मतदार संघात चौरंगी लढत झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडले. तब्बल एक महिन्यानंतर उद्या मतमोजणी होणार आहे. मतदारसंघात 18 लाख 86 हजार 294 मतदार आहेत. त्यापैकी 11 लाख 95 हजार 242 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजावला आहे. मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत झाली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र बदलले. विशेष म्हणजे हे चारही उमेदवार मतब्बर आहेत. त्यामुळे चार वेळा निवडून आलेले विद्यमान खा. चंद्रकांत खैरे यांच्यापुढे चांगलेच आव्हान उभे राहिलेले आहे. खैरे यांच्याविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. सुभाष झांबड, शिव स्वराज्य बहुजन पक्षाचे आ. हर्षवर्धन जाधव व वंचित बहुजन आघाडीतर्फे मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह अपक्ष उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. चौरंगी लढतीत चारही उमेदवार प्रबळ असल्याने विजयी होणारा उमेदवार मोठ्या फरकाच्या मताने निवडून येणार नाही असे बोलले जात आहे. अनेक खासगी संस्थांच्या सर्व्हेक्षणात शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे हे विजयी होणार असल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्ष मात्र उद्या मतमोजणीनंतरच खरे चित्र समोर येणार आहे. 

सरासरी 26 फेर्‍या मतमोजणीच्या होणार आहेत. त्यानंतर व्हीव्ही पॅटची मोजणी घेतली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील 5 बुथ वरील व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार आहे. सहा विधानसभेतील 30 मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार असल्याने मतमोजणीला उशीर होणार आहे. पोलिस उपायुक्त खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्रात व बाहेर 300 पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांतर्फे शहर आणि जिल्ह्यात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.